लेखक – दिलीप चावरे
राष्ट्रपतीपदाच्या भाजपा उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना राज्यातील सत्ताबदलामुळे किमान दहा हजार जादा मते मिळून त्यांच्या विजयाची शाश्वती अधिक बळकट होणार आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर आता शिवसेना आणि अपक्ष अशा ५० पेक्षा अधिक आमदारांचे समर्थन भाजपला लाभणार आहे. परिणामी या महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राज्यातील मतांची आकडेवारी बदलत आहे. विधानसभेतील १६५ पेक्षा जास्त आणि त्या बरोबर शिवसेनेतीलही अनेक खासदारांचे समर्थन लाभणार असल्याने मुर्मू यांना राज्यात दहा हजारांपेक्षा अधिक मतमूल्याचा लाभ स्पष्टपणे सूचित करत आहेत.
देशाच्या घटनेमधील तरतुदीनुसार राज्यातील प्रत्येक आमदाराचे मतमूल्य १७५ तर प्रत्येक खासदाराचे मतमूल्य ७०० आहे. या प्रकारे राज्यातील आमदारांचे एकूण मतमूल्य ५०,४०० असले तरी हे मूल्य आता ५०२२५ झाले आहे कारण अंधेरीचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाले आहे. सुमारे पंधरवड्याआधी महाविकास आघाडीला १६० पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा होता. तेव्हाच्या हिशेबानुसार भाजपाकडे १२०च्या आसपास आमदार होते. म्हणजेच पाठिंबा असलेल्या या आमदारांचे एकूण मतमूल्य सुमारे २१,000 अपेक्षित होते. पण गेल्या दोन आठवडय़ांतील सत्ताबदलानंतर राष्ट्रपती निवडणुकीतील गणितच राज्यात बदलून गेले आहे.
राज्य विधानसभेतील विश्वास प्रस्ताव आणि विधान सभा अध्यक्षांच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला १६४ आमदारांचे समर्थन लाभले. खेरीज अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचेही मत आहेच. आता महाविकास आघाडीचे संख्याबळ ११० पर्यंत घटले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ५० अधिक आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने मुर्मू यांच्या मतमूल्यात राज्यात सुमारे ८,७५० किंवा जास्तही वाढ होणार आहे. शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी अनेक खासदार मुर्मू यांचे समर्थक आहेत. या खासदारांच्या जोरावर द्रौपदी मुर्मू यांना दहा हजारांपेक्षा अधिक मतमूल्याचा लाभ होईल असे चित्र आहे.